तीच…
- vaibhavisamant001
- Mar 8, 2021
- 2 min read

“ती” म्हटलं की तीची बरीच रुप डोळ्यांसमोर उभी रहातात. गरम गरम पोळ्या आग्रहाने सगळ्यांना खाऊ घालणारी, कुणाला बर नसलं की रात्र रात्र जागरण करुनही, पहाटेच कामाला लागणारी, ऑफिसमध्ये कितीही काम असलं आणि अगदी कितीही मोठा हुद्दा असला, तरी घरी आल्यावर पदर खोचुन ओट्यापुढे उभी रहाणारी ती. आपण आधुनिक झालो, समानता वगैरे अवजड शब्द सर्रास वापरायला लागलो पण उंबऱ्याच्या आत तिच्यावर पिढ्यांपिढ्या असलेली जबाबदारी मात्र या समानतेला अपवादात्मक ठरली. समाजमान्य आदर्श आणि सौंदर्याचे मापदंड स्वत: वर लादुन घेता घेता नेमकी तिच्यातली ती कुठे तरी हरवून जाते.
नऊवार साडी नेसणारी माझी पणजी असो किंवा शर्ट पॅंट घालुन फिरणारी माझी भाची, वेगवेगळ्या वेशातल्या तीला काही मर्यादा येतातच. जर कुणी त्याग करायचा असेल तर तो तिने, अशी आपल्या समाजाची पुर्वीपासुनची मानसिकता आहे. पदरी पडलं, पवित्र झालं; असं म्हणुन तिने आहे त्यात आनंद मानुन घ्यायचा हे तिला अगदी लहानपणी पासुन शिकवल जातं. सोज्वळ, सुशील, सुंदर, संस्कारी, सुगरण अशा अनेक निकषांवर तिची कसोटी घेतली जाते. माझ्या मते आपल्या देशातली जवळपास सगळीच लग्न आणि पर्यायाने कुटुंब ही “ती” च्या सोशिकतेच्या आणि सहनशक्तीच्या पायावर उभी आहेत. खरं तर तिच कुटुंब, त्यांची स्वप्न आणि तीची धावपळ हे सगळ्याच घरात पहायला मिळतं. या सगळ्यात बऱ्याचदा ती मात्र कुठेच नसते.
पण हल्ली ती बदलतेय. मला माझ अस्तित्व, निवड आणि ठाम मतं आहेत हे सांगण्या इतकी ती सुजाण होतेय. घर- संसार हे माझ जग नसुन त्याचा एक भाग आहे ह्याच तिला भान आहे. तिच्या नकट्या नाकाचा, सावळ्या रंगाचा किंवा गोल पोळ्या न बनवता येण्याचा तिला आता न्यूनगंड वाटत नाही. स्वत:च्या मेहनतीचा मोबदला मागताना तिला कमीपणा वाटत नाही. मी बाहेर काम करते त्या मुळे घरात तुलाही करायला हवं हे जोडीदाराला सांगण्या इतका भिडस्तपणा तिने अंगी बाणवलाय. त्रासदायक रुढी, परंपरांवर प्रश्नचिन्ह उभं करण्या इतकी ती समंजस झाली. काळाच्या चारशे पावलं पुढे जाऊन बदल घडवणाऱ्या जिजाऊ असोत, सावित्री बाई असोत किंवा पहिल्या डाॅक्टर झालेल्या आनंदीबाई असोत. ती विरोध करायला शिकली, बदल घडवायला लागली. कधी ती बदलाचा भाग झाली तर कधी स्वत: बदल झाली.
अन्यायाला विरोध करणारी ती कित्येकींच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते. तिच्यात काहीतरी करण्याची जिद्द आहे, स्वप्न आहेत, मेहनत करण्याची तयारी आहे. स्वत: ची योग्यता सिद्ध करुन लोकांची मानसिकता बदलवणाऱ्या आणि प्रसंगी आईची माया देणाऱ्या, हक्काने कान धरणाऱ्या, खंबीरपणे कोणत्याही प्रसंगावर तोंड देणाऱ्या तीला तसं बघायला तर साजरं करण्यासाठी कोणत्याही दिवसाची गरज नाही पण तरीही ती खास आहे ही जाणीव तीला करुन देण्या साठी हा महिला दिनाचा खटाटोप. तीला आणि तिचा सन्मान करणाऱ्या सगळ्यांनाच गिरगांव कट्टा तर्फे मानाचा मुजरा..!!
:सोनचाफा
Comments